बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाब काँग्रेसमधील वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादावर पडदा पडतो न पडतो तोच आता माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी नाराजीचा सूर लावला आहे. सिद्धू प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या कार्यक्रमाला आपणास माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून निमंत्रण दिले नाही म्हणून त्यांनी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
सुनील जाखड यांनी म्हटले आहे की, जर कोणी नाराज झाले तर त्यांची समजूत काढण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरी जाता. पण, आज आपण मलाच विसरलात. जाखड यांच्या नजिकच्या सूत्रांनी सांगितले की, जाखड यांना पंजाबच्या नेत्यांनी या कार्यक्रमासाठी बोलाविले होते. पण, माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रण नव्हते.
पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रताप सिंग बाजवा यांच्यावरही जाखड यांनी टीका केली आहे. जाखड यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची स्तुती करत सिद्धू यांचे स्वागत केले आहे. अमरिंदर सिंग यांना त्यांनी आवाहन केले आहे की, कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश जायला हवा की, हे आपले सरकार आहे बाबूंचे नव्हे.
मंत्र्यांनी ३ तास पक्ष मुख्यालयात थांबावे : सिद्धूपंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मंत्र्यांना तीन तास पक्ष मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. पुढील महिन्यापासून सिद्धू हे स्वत: चंदीगडच्या सेक्टर १५ मधील काँग्रेस कार्यालयात थांबणार आहेत. आमची कामे होत नाहीत, असे आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्यानंतर सिद्धू यांनी हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मंत्री काँग्रेस भवनमध्ये आल्यास पक्ष कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडू शकतील.