भिवंडी मतदारसंघात यंत्रमाग कामगारांचे प्रश्नच निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:32 AM2019-01-28T04:32:16+5:302019-01-28T04:33:23+5:30
एमआयएम, सपाकडेही लक्ष; शिवसेनेची गणिते युतीवर अवलंबून
- पंढरीनाथ कुंभार
डहाणू मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर २००९ मध्ये भिवंडी मतदारसंघ उदयास आला. डहाणू मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. फेररचनेत इतर नवीन क्षेत्रांचा सहभाग झाल्यानंतरही काँग्रेसनेभिवंडी लोकसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवत, तेव्हाचे उमेदवार सुरेश टावरे यांना निवडून आणले होते. त्यात भिवंडीतील मतदारांची भूमिका निर्णायक होती.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपा-सेना युतीने राष्ट्रवादीतून आलेले स्थानिक उमेदवार कपिल पाटील यांना संधी दिली. भिवंडीबाहेरील विश्वनाथ पाटील यांना दिलेली उमेदवारी आणि मोदी लाट असा दुहेरी फटका काँग्रेसला बसला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन महापालिका आणि एका नगरपालिकेचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा येथील यंत्रमाग उद्योगाला प्रचंड फटका बसला. अनेक कामगार देशोधडीला लागले. त्यामुळे यंत्रमाग व्यावसायिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करीत आहेत. पण घोषणाबाजीपलीकडे त्यात यश आलेले नाही. या नाराजीचा फायदा कोण उठवू शकतो, त्यावर येथील कौल अवलंबून आहे.
कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो, यावर पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत. भारिप-बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर केलेल्या युतीतील भिवंडी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. समाजवादी पक्षाची दोन्ही काँग्रेसशी आघाडी झाली, तर तो पक्ष मुस्लीम उमेदवारासाठी प्रयत्नशील आहे.
येथील मुस्लीम मतदारांनी आजवर काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. मागील निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या आरोपामुळे त्यांच्यावर स्थानिक कोर्टात खटला भरण्यात आला. त्या याचिकेच्या सुनावणीनिमित्ताने साडेचार वर्षांत ते भिवंडीत वरचेवर आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसमधून आता प्रदीप रांका, माजी खासदार सुरेश टावरे, विश्वनाथ पाटील, राकेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार योगेश पाटील हे उत्सुक आहेत.
युती झाल्यास मतदारसंघावरील भाजपाचा दावा कायम असेल. शिवसेनेची नाराजी कायम असल्याने युती न झाल्यास सुरेश (बाळामामा) म्हात्रे व प्रकाश पाटील उत्सुक आहेत. खा. कपिल पाटील यांनी चांगली कामगिरी केली. परंतु यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यात कमी पडले. अनेक प्रयत्नांनंतरही वस्त्रोद्योग मालकांचे, कामगारांचे प्रश्न म्हणावे तसे सुटलेले नाहीत. याचा फटका भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी पालिकेतील काँग्रेसच्या नकारात्मक कारभाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.
भिवंडीतील मतदार
एकूण मतदार- 17,85,952
पुरुष- 9,87,431
महिला- 7,98,411
सध्याची परिस्थिती
यंत्रमाग उद्योग डबघाईला आल्याने चिंतित व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे या निवडणुकीत निर्णायक मतदान.
भिवंडी महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस आणि शिवसेना खूप जवळ आले. सत्ता स्थापनेवेळी फोडाफोडीच्या भाजपाच्या प्रयत्नांना दोघांनी एकत्र विरोध केला. ती मैत्री लोकसभेत कशी राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कल्याण, बदलापूरच्या शहरी मतदारांपेक्षा काँग्रेस, भाजपा नेत्यांनी मुरबाड, शहापूरच्या मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत बसला.
भिवंडीतील मुस्लिम मतदार, ग्रामीण भागातील कुणबी, आगरी मतदारांचा विचार करून जो पक्ष उमेदवार देईल त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये मिळालेली मते
कपिल पाटील (भाजपा)- 4,11,070
विश्वनाथ पाटील (काँग्रेस)- 3,01,620
सुरेश (बाळा मामा) म्हात्रे (मनसे)- 93,647
अन्सारी सत्तार (बीएसपी)- 14,068
मधुकर विठ्ठल पाटील (सीपीआय)- 13,720