मुंबई – सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) केंद्रस्थानी आले आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्याराहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे संकेत दिले गेले. मात्र याच भेटीनंतर आणखी एका चर्चेला मोठं उधाण आलं आहे. आगामी ‘राष्ट्रपती’पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी प्रशांत किशोर लॉबिंग करत असल्याची दिल्लीत चर्चा आहे.
शरद पवारांच्या दिल्लीत सुरु असलेल्या चर्चेनं राज्यातही कुजबूज सुरू झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडी टक्कर द्यायची असेल तर शरद पवारांना पुढे करावं लागेल असं म्हटलं जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, भाजपाविरोधी आघाडी बनवायची असेल तर सध्या विरोधी पक्षाकडे चेहरा नाही. पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवारच योग्य चेहरा आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
विरोधकांची आघाडी बनवून मोदींना पर्याय उभा करायचा असेल तर शरद पवार चेहरा आहेत. तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. शरद पवारांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. देशपातळीवर असा प्रयोग करायचा असेल तर शरद पवार सर्वमान्य चेहरा आहे. तेच योग्य ठरतील असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
‘राष्ट्रपती’पदाच्या चर्चेवर शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांची तीनदा भेट घेतल्यावर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधी पक्षांचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याबद्दल प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर तशी कोणताही किशोर यांच्यासोबत झाली नसल्याचं पवारांनी सांगितलं आहे.
काँग्रेसला मान्य असणार?
सोनिया गांधींचा परदेशी मुद्दा उपस्थित करत शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीत कुरघोडी सुरूच असतात. त्यातच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अलीकडे युपीएच्या अध्यक्षपदासाठीही शरद पवारांच्या नावाची चर्चा झाली. मात्र काँग्रेसनं त्याला विरोध केला. त्यामुळे नेतृत्वावरून काँग्रेस आणि शरद पवार यांच्यातील वाद काही लपून नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या नावाला काँग्रेस पाठिंबा देईल का? की राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव पुढे करून पुढची रणनीती करणार हे आगामी काळात दिसून येईल.