काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:46 PM2019-05-27T18:46:38+5:302019-05-27T18:55:27+5:30

चारही आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता

radhakrishna vikhe patil and four congress mlas likely to join bjp | काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

Next

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणेंचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसणार आहेत. चार आमदारांनी पक्षाला रामराम केल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं. 

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे पक्षातील वरिष्ठ नेते राजीनामे देऊ लागले आहेत. देशातील 13 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. यानंतर आता काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटवर निवडूनदेखील आले आहेत.

औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. जूनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी एका व्हिडीओतून दिला आहे. तर मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते. ते लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश करू शकतात. तर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेदेखील भाजपात जाऊ शकतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नारायण राणेंना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं आहे. यासोबतच माणचे आमदार जयकुमार गोरेदेखील काँग्रेसला हात दाखवून हातात कमळ धरू शकतात.
 

Web Title: radhakrishna vikhe patil and four congress mlas likely to join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.