कोल्हापूर : सध्या मुलगा डॉ. सुजय यांनी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा झेंडा हातात घेतल्याने प्रचंड चर्चेत आलेले विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात अचानक येऊन गेले. ते तब्बल दोन तास गायब होते. यादरम्यान त्यांनी कुणाचे ‘दर्शन’ घेतले याबद्दल उलट-सुलट चर्चेला ऊत आला.विखे-पाटील यांचा हा खासगी दौरा होता. ते हेलिकॉफ्टरने दुपारी १.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आले. विमानतळावर त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केली होती. पत्रकारांनी त्यांना गाठले व काही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला. ‘मी दर्शनासाठी आलो आहे,’ एवढे एकच वाक्य ते बोलले. त्यावर ‘कुणाच्या दर्शनासाठी,’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी केल्यावर ‘ते तुम्हाला सांगायला हवे का,’ असे प्रत्युतर देत ते गाडीत बसले. या गाडीतून ते कावळा नाक्यापर्यंत आले. तिथे दुसरी इनोव्हा गाडी आली. अगोदरच्या गाडीतून ते घाईघाईतच उतरले व दुसऱ्या गाडीतून निघून गेले. ते दुपारी २ वाजता कावळा नाक्यापासून गायब झाले. त्यानंतर पुन्हा तिथेच ते ३.४५ वाजता परत आले. इनोव्हातून उतरून अगोदरच्या गाडीत ते बसले व त्यातून ते विमानतळावर गेले. ४.१२ मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले.अंबाबाईला जायचे म्हणून ते बिंदू चौकापर्यंत आले होते परंतु तेथून त्यांची गाडी कागलला गेल्याचे समजते. ते नेहमीच जोतिबाला येतात परंतु त्याच्या दर्शनालाही ते गेलेले नाहीत. त्यांना कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यांच्यासोबत त्यांचा स्वीय सहाय्यकही नव्हता. कोणताही प्रोटोकॉल नव्हता. इतक्या घाईगडबडीत ते येथे कुणाकडे आले व दोन तास कुठे गायब होते, याचीच जोरदार चर्चा झाली. ते कुण्या ज्योतिषाकडे गेले असण्याची शक्यता व्यक्त झाली, परंतु त्यास दुजोरा मिळू शकला नाही. भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीत होते परंतु त्यांनाही ते भेटायला गेले नसल्याचे समजले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:33 AM