Rahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:10 AM2021-05-18T07:10:45+5:302021-05-18T07:11:05+5:30
दोघांचाही मर्यादेपेक्षा अधिक खोटा प्रचार झाला आहे. दोघेही आपले काम करण्यात फेल ठरले आहेत
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आदी सुविधांअभावी देशात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पीएम केअर अंतर्गत दिलेले व्हेंटिलेटर आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात साम्य आहे. दोघेही काम करण्यात अयशस्वी ठरल्याची टीका राहुल गांधी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, दोघांचाही मर्यादेपेक्षा अधिक खोटा प्रचार झाला आहे. दोघेही आपले काम करण्यात फेल ठरले आहेत आणि गरज असते तेव्हा दोघांनाही शोधणे अवघड आहे. व्हेंटिलेटरची कमतरता प्रत्येक राज्यात आहे. पंजाबमधून सुरु झालेला हा प्रकार आता देशाच्या छोट्या गावातूनही दिसत आहे. व्हेंटिलेटर मिळाले तरी त्याचा उपयोग होत नाही. केंद्र सरकारचा असा दावा आहे की, त्यांनी राज्यांना पर्याप्त व्हेंटिलेटर दिले आहेत. पण, राज्य सरकार त्याचा योग्य उपयोग करत नाही.
कोणत्या राज्यात किती
२३,६९९ व्हेंटिलेटर देशातील विविध हॉस्पिटलमध्ये लावण्यात आले. पीएम केअर फंड अंतर्गत केंद्र सरकारने खरेदी केलेल्या ७९४८ व्हेंटिलेटरचाच हा एक भाग होता. केंद्र सरकारचा असा दावा आहे की, विविध राज्यांना ३६,८२५ पैकी ३०,८९३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला ४४३४ व्हेंटिलेटरचे वाटप झाले. यातील ४४२७ व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला आहे. ३५५९ व्हेंटिलेटर संबंधित ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
धूळखात पडून
उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात केंद्र सरकारने पाठविलेल्या व्हेंटिलेटर्सचे बॉक्स अद्याप खुले केले नाहीत. कारण, व्हेंटिलेटर चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नाही. तर, काही ठिकाणी व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. फिरोजाबादमध्ये २७ पेक्षा अधिक व्हेंटिलेटर पडून आहेत. कारण, गुणवत्तेबाबत डॉक्टर समाधानी नाहीत.