Rahul Gandhi: “जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर…”; राहुल गांधींनी सांगितलं काय काय केलं असतं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 11:11 AM2021-04-03T11:11:04+5:302021-04-03T11:12:39+5:30
अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ऑनलाईन मुलाखत घेतली.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाही. विविध मुद्द्यावरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि भाजपाल जेरीस आणतात. नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींनीही दिलखुलास उत्तर दिलं.
अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी घेतलेल्या ऑनलाईन मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान असतो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. मी विकास केंद्रीत राजकारणापेक्षा रोजगार उपलब्धतेवर भर दिला असता, आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याचसोबत उत्पादन क्षमता वाढवणे, आणि रोजगाराच्या संधी देणे यासाठी सर्वकाही केले असते.
तसेच सध्या आपला विकास पाहिला तर रोजगार निर्मिती, अतिरिक्त सुविधा आणि उत्पादन यांच्यात जसा ताळमेळ असायला हवा, तसा दिसत नाही, वॅल्यू एडिशनमध्ये चीन पुढे आहे, मी कधीही अशा चीनी नेत्याला भेटलो नाही ज्याने मला त्यांच्या देशात रोजगार निर्मितीची समस्या आहे असं म्हटलंय असं राहुल गांधी म्हणाले.
मी सांगितलं होतं, परंतु सरकारला नंतर कळालं
कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल राहुल गांधी म्हंटले की, मी लॉकडाऊनच्या सुरुवातीला सांगितलं शक्तीचं विकेंद्रीकरण केलं जावं, परंतु काही महिन्यानतर केंद्र सरकारला ही गोष्ट कळाली, तोपर्यंत भरपूर नुकसान झालं होतं, आता फक्त एकच उपाय आहे की, लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यासाठी काँग्रेस न्याय योजनेचा विचार करत आहे.
सत्ताधाऱ्यांनी भारताच्या संघटनात्मक व्यवस्थेवर पूर्णपणे कब्जा केला आहे. २०१४ च्या पूर्वी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष काम करत होते, आता त्यात बदल झाला आहे, ज्या संस्थांनी निष्पक्ष राजकीय लढाईचं समर्थन करायला हवं, आता त्या करत नाहीत. ज्यांना लोकांचं संरक्षण करायला हवं, त्या संस्था तसं करत नाहीत. भारतात काय होतं, त्यावर अमेरिकन सरकार कोणतीही प्रतिक्रिया देत नाही असंही राहुल गांधी म्हणाले.