नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असतानाच आता पुन्हा एकदा काँग्रेसाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या वेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते.5 तासहून अधिक वेळ चालली बौठक - सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. यावेळी उपस्थित सर्व नेते मंडळींनी आपापले विचार व्यक्त केले. तसेच या बैठकीत, राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणीही करण्यात आली. यानंतर अखेर, पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
या खासदारांनी केली मागणी -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत के. सुरेश, अब्दुल खालिक, गौरव गोगोई आणि काही इतर खासदारांनी, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा साभाळावी, असा आग्रह केला होता. या खासदारांशीवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, दिग्विजय सिंह देखील म्हणाले, की आता राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. नुकतेच, काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अशीच मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचे अनेक नेत्यांनी समर्थनही केले होते.
'सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा' -राहुल गांधी यांनी 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर, या पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहूल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिले होते, 'काँग्रेस अध्यक्ष म्हणून 2019मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत मिळालेल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. आपल्या पक्षाच्या भविष्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक आहे. यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'