केंद्राची ७ वर्षे; राहुल गांधींची उपरोधिक टीका; मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:29 AM2021-05-31T06:29:09+5:302021-05-31T06:30:03+5:30
राहुल गांधी यांनी ‘ द इकॉनॉमिस्ट’च्या हवाल्याने ट्विट करून मेक्सिको, ब्राझील, हंगेरी, अमेरिका आणि भारत सरकारच्या नेतृत्वाला सहा मुद्यांवर तुलनात्मक अध्ययनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण गुण दिले आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपरोधिकपणे टोमणे मारले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसनेही ‘भारत माता की कहानी’ असा एक व्हिडिओ जारी करून नोटबंदीसह सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणारे सर्व मुद्दे उपस्थित करून सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला.
राहुल गांधी यांनी ‘ द इकॉनॉमिस्ट’च्या हवाल्याने ट्विट करून मेक्सिको, ब्राझील, हंगेरी, अमेरिका आणि भारत सरकारच्या नेतृत्वाला सहा मुद्यांवर तुलनात्मक अध्ययनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण गुण दिले आहेत. या सहा मुद्यांत लोक इच्छेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा, विरोधकांचा अपमान, जाती आणि धार्मिक अल्पसंख्यांकाप्रति द्वेष, संस्था दुबळ्या करणे, कायद्याचा आदर करण्यात अपयश आणि विज्ञानाकडे दुर्लक्ष करण्याचा समावेश आहे.
या ट्विटआधी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी हवी प्रामाणिक नियत, निश्चय आणि धोरण हवे. महिन्यातून एकदा निरर्थक बोल नाही. प्रत्यक्षात राहुल गांधी यांचा रोख पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ वर होता.
दुसरीकडे, काँग्रेसनेही नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, गंगेत वाहते मृतदेह, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी या मुद्यांवरून ‘भारत माता की कहानी’ असा एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे. काँग्रेसने या व्हिडिओत, ‘गुन्ह्याला माफी नसते’, असे म्हटले आहे.
खूप काही गमावले
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर सत्तेचा वार होत आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था, लोकशाहीच्या प्रतिष्ठेचे वस्त्रहरण यासह या देशाने या सात वर्षात जे विलक्षण होते, तेही गमावले. आता उत्तर मागणे आणि हिशेब करण्याची वेळ आली आहे, असे यात लोकांना आवाहनही करण्यात आले.