नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोईंबत्तूरमध्ये पोहचले आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
"पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे. तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक"
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोड शो चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच यासोबत पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये येऊन खूश असल्याचं म्हटलं आहे. "शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक" असल्याचं म्हणत काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. "केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनावश्यक चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न निरर्थक आहे. देशातील अन्नदाता सरकारचा उद्देश जाणत असून त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे कृषी विरोधी कायदे मागे घ्या" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
"काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहीला गरीब", जावडेकरांचा हल्लाबोल
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात "खेती का खून" नावाने एक बुकलेट जारी केलं आहे. यानंतर आता केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बुधवारी चर्चेची दहावी फेरी होणार आहे. "कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा अशी काँग्रेसची इच्छा नाही. काँग्रेसला खून या शब्दाबाबत जास्त प्रेम आहे. तुम्ही खेती का खून असं म्हणत आहात, पण तुम्ही देशाच्या विभाजनावेळी हत्येचा खेळ खेळला, त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला, ती हत्या नव्हती का?" असा सवाल विचारत जावडेकर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.