नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. चौकीदार चोर है प्रकरणात राहुल गांधींनी तिसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. याआधीच्या दोन प्रतिज्ञापत्रात त्यांनी खेद व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. यावर न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)राफेल डील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना 'आता सर्चोच्च न्यायालयदेखील म्हणतंय चौकीदार चोर है,' अशी प्रतिक्रिया देत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपानं तीव्र आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयानं असं कोणतंही विधान केलेलं नाही. तरीही राहुल गांधी असं विधान करुन न्यायालयाचा अवमान करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राहुल यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. न्यायालयानं 30 एप्रिलला राहुल यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. राहुल गांधींनी शपथपत्रात त्यांची चूक कबूल केली. आपण चुकीच्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या नावानं भाष्य केल्याचं राहुल यांनी शपथपत्रात म्हटलं. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं शपथपत्र तीन पानांचं आहे. याआधीच्या दोन शपथपत्रांमध्ये खेद करणाऱ्या राहुल यांनी तिसऱ्या शपथपत्रात न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. आपण न्यायालायाची माफी मागत असून पंतप्रधान मोदी किंवा भाजपाची माफी मागत नसल्याचं राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं होतं.