नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?" असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. व्हिडीओ शेअर करत मोदींवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एका जवानांनी 'नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातं आहे' असं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. याआधी त्यांनी ट्विटरवरून टीकास्त्र सोडलं होतं. "पंतप्रधानांनी आपल्यासाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे 30 लाख, जॅकेट-ग्लोव्हज 60 लाख, बूट 67 लाख 20 हजार, ऑक्सिजन सिलिंडर 16 लाख 80 हजार, पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही" असं म्हटलं होतं.
"पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा; प्रश्नांना सामोरं जा"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल टनेलचे उद्घाटन केले आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढेल, असे प्रतिपादन मोदींनी या बोगद्याचे उद्घाटन करताना केले. मोदींनी या बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोगद्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केले. मात्र, बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी विचारला आहे. मोदींचा हात दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी निशाणा साधला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) एक व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला. "पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. नरेंद्र मोदींवर विविध मुद्यांवरून व्हिडीओमध्ये त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
"सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय"
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय" असं म्हणत राहुल यांनी टीका केली. तसेच यासोबत एक व्हिडीओही ट्विट केला. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच "उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी अमानवीय प्रकार करतंय. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटू दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.