मुंबई - एका कंपनीने जाहिरातीमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बदनामी केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून, मुंबईमध्ये संबंधित कंपनीचे कार्यालय काँग्रेसच कार्यकर्त्यांनी फोडले. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या जाहिरातीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. माच्र आता या प्रकारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार राजकारण पेटले आहे. (Rahul Gandhi's notoriety, Congress workers angry over the advertisement )
STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. दरम्यान, या जाहिरातीमधून काँघ्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी झाल्याचा दावा करत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयावर चाल केली.
दरम्यान, या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिरातीमधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक!! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असा इशाराही भाई जगताप यांनी दिला.
दरम्यान, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या जाहिरातीवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. आलू से सोनाच्या धर्तीवर... यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले.संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही? पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाट्टेल ती हलकट विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाउन च्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी यावेळी लगावला.