'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:00 AM2019-04-20T04:00:29+5:302019-04-20T04:01:58+5:30
मी राजकारणातून निवृत्त होणार नाही; पण मला पंतप्रधानपदाची इच्छा नाही.
बंगळुरू : मी राजकारणातून निवृत्त होणार नाही; पण मला पंतप्रधानपदाची इच्छा नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास मी त्यांच्या शेजारी बसेन, अशा स्पष्ट शब्दांमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कॉँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
देवेगौडा यांच्या कर्नाटकातील तुमकूर मतदारसंघात गुरुवारी मतदान पार पाडले. त्यानंतर बोलताना त्यांनी आपण तीन वर्षांपूर्वीच निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती, याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, तीन वर्षांमध्ये परिस्थिती बदलल्यानेच मला निवडणूक लढवावी लागली. मला मोदी संसदेमध्ये नको आहेत. मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार नाही.
त्यांचे चिरंजीव व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देवेगौडा पंतप्रधानपदासाठी सर्वसंमतीचे उमेदवार होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यावर देवेगौडा यांनी आपल्याला कोणत्याही पदाची अभिलाशा नसल्याचे सांगितले.
राहुल यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले. आमचा पक्ष लहान असतानाही सोनिया गांधी यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यामुळेच आता कॉँग्रेसला पाठिंबा देणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>पक्षालाच अधिक प्राधान्य
देवेगौडा पक्षापेक्षा आपल्या कुटुंबाची जास्त काळजी करतात असा त्यांच्यावर आरोप होतो. त्यावर त्यांनी अनेक सहकारी सोडून अन्य पक्षांमध्ये गेले असल्याचे मान्य केले. मात्र मी माझ्या कुटुंबातील कोणाला पक्षाचे अध्यक्ष बनविलेले नाही, असे सांगताना, मी पक्षाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचा खुलासाहंी त्यांनी केला.