मुंबई – काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव जगपात हे आजारी होते. रविवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. माणिकराव जगपात हे विद्यमान रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते.
माणिकराव जगताप यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे. मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना असं त्यांनी म्हटलं आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे मित्र, सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्नेहल, सुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना असं त्यांनी सांगितले आहे.
कोण आहेत माणिकराव जगपात?
२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचा पराभव राष्ट्रवादीचे माणिकराव जगताप यांनी केला. महाडच्या राजकीय इतिहासात हा पराभव महत्त्वाचा मानला गेला. २००४ मध्ये प्रभाकर मोरे यांचा पराभव माणिकराव जगताप यांनी अवघ्या साडेतीन हजार ७७९ मतांनी केला. तर २००९ मध्ये भरत गोगावले यांनी तब्बल १४,९६० मतांनी प्रभाकर मोरे यांच्या पराभवाचा वचपा काढला. २०१४ च्या निवडणुकीत माणिकराव जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढली आणि माणिकराव जगताप यांना २०१४ मध्येही पराभव पत्करावा लागला. या वेळी २१,२५६ मतांची आघाडी भरत गोगावले यांना मिळाली.