‘देर आये, दुरुस्त आये’, काँग्रेसच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकले - सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:57 PM2020-10-20T19:57:17+5:302020-10-20T19:59:37+5:30
Sachin Sawant : भाजपाचे नेते शुक्राचार्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून अडथळे आणत होते, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी, या करिता रेल्वेच्या अधिका-यांसमवेत समग्र चर्चा करून निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १७ ऑक्टोबरपासून होणार असताना १६ ऑक्टोबरला राज्य सरकारचे पत्र गेल्यानंतर भाजपा नेत्यांच्या दबावाखाली रेल्वे अधिक-यांनी घुमजाव केले. भाजपाचे नेते शुक्राचार्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून अडथळे आणत होते, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
याचबरोबर, काँग्रेसने भाजपाचे गलिच्छ राजकारण उघडकीस आणून रेल्वे अधिका-यांच्या चालढकलीचे बिंग फोडल्यानंतर आज रेल्वे प्रशासन दबले असून आता महिलांना लोकल प्रवासास परवानगी देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत देर आये दुरुस्त आये, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याकरिता रेल्वे प्रशासन जी कारणे देत होते, ती अत्यंत तकलादू होती. रेल्वे बोर्डाची संमती पाहिजे. कोविडचे प्रोटोकॉल राज्य सरकारने कळवावेत आणि किती महिला प्रवास करणार याची आकडेवारी द्यावी. या तऱ्हेचा कांगावा केला जात होता. परंतु सदर माहिती रेल्वे प्रशासनाकडे अगोदरच होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Result of pressure by @INCMaharashtra We exposed strategy of Railways to procrastinate & give reasons. Decision of women's entry in locals was taken on 13th Oct & state sent letter on 16th. Today's was a reminder. देर आये दुरुस्त आये! Will kp fighting against BJP's dirty politics https://t.co/2aKCWBdUVU
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 20, 2020
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय जाहीर करताना मुख्य सचिवांनी आज दिलेल्या पत्रानुसार हा निर्णय जाहीर केला असे म्हटले आहे. परंतु या पत्रामध्ये कोणतीही आकडेवारी अथवा कोविड मोडॅलिटीचा उल्लेख नाही. मग हा निर्णय कसा घेतला गेला? असा प्रश्न पीयूष गोयल यांना विचारून यातूनच केंद्र सरकारचे आणि रेल्वेचे बिंग फुटले आहे, असे सावंत म्हणाले. भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा यापुढेही काँग्रेस विरोध करत राहील, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा
महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असे विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डला केले होते. मात्र, राज्य सरकारच्या या विनंतीला रेल्वेने सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आता महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. "मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत" असे गोयल यांनी म्हटले आहे.