राज ठाकरे विधानसभेला आघाडीसोबत; मुख्यमंत्र्यांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 06:21 AM2019-04-22T06:21:16+5:302019-04-22T06:21:26+5:30
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही सर्वत्र मोदी लाट असल्याचा दावा
मुंबई : सध्या लोकांची करमणूक करणारे आणि राजकीय अस्तित्व शोधणारे राज ठाकरे हे पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जातील आणि निवडणूक लढवतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी निवडक पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील पहिल्या दोन टप्प्यातील १७ पैकी १३ लोकसभा जागा भाजप-शिवसेनाच जिंकेल आणि अन्य चार जागांवर आम्हालाच ‘अॅडव्हान्टेज’ आहे, असे भाकीत त्यांनी ठामपणे वर्तविले. शहरी व ग्रामीण भागातही पंतप्रधान मोदींची सुप्त लाट आहे आणि निकालात ती तुम्हाला दिसेल, असे ते म्हणाले.
‘जी गोष्ट बोलताना लाज वाटायला पाहिजे ती ते अभिमानाने सांगतात. सभेच्या सुरुवातीलाच माझा पक्ष कोणतीही निवडणूक लढवित नसल्याचे बोलतात. एखाद्या राजकीय पक्षासाठी एवढी लाजिरवाणी बाब दुसरी असू शकते का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. २०१४ मध्ये लाटेत मोदी जिंकले, असे राज म्हणाले होते पण नंतर महापालिकेपासून सगळीकडेच मनसे धुतली गेली. त्यामुळे म्हणा किंवा कदाचित नोटाबंदीचा फटका बसल्यामुळे राज हे मोदींबद्दल इतके अस्वस्थ असावेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. ते स्व:त या निवडणुकीत ‘नॉन प्लेअर’ असल्यामुळे आम्ही त्यांना फारशी उत्तरे देत नाही. स्वत: खेळायला आले की पाहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लोकसभेच्या १७ जागांपैकी भाजप-शिवसेना युती १३ जागा निश्चितपणे जिंकेल. उर्वरित चार जागांवरही युतीलाच ‘अॅडव्हान्टेज’ आहे. आमचे नेते नितीन गडकरी यांचा विजय हा विरोधकांची तोंडे बंद करणारा असेल. मुंबई, ठाण्यातील दहाही जागा आम्ही जिंकू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकपासून देशाला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता या मुद्यांवर राज्यात मोदी लाट असल्याचे आपल्याला प्रचारादरम्यान जाणवते. त्यामुळे गेल्यावेळपेक्षा युतीला अधिक जागा मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. युतीने गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या.
आतापर्यंत राज्यात झालेल्या १७ जागांच्या निवडणुकीचा संभाव्य निकाल आपल्या मते काय असेल?
मी लोकांमध्ये जातोय, पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने प्रचंड सुप्त लाट मला जागोजागी दिसते. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात विदर्भात दहा जागांची निवडणूक झाली. त्यातील आठ जागा युती एकतर्फी जिंकेल. अन्य दोन जागांवर वेगवेगळे रिपोर्ट्स येताहेत पण त्यानुसारही युती पुढे दिसते. मराठवाड्यात सहापैकी चार जागा आम्ही नक्कीच जिंकू. इतर दोन ठिकाणी ‘अॅडव्हान्टेज युती’ आहे. कुठलेही मुद्दे नसले की जातीपातीचे राजकारण केले जाते. तसे काही ठिकाणी झाले पण जनतेने त्याला भीक घातली नाही, हे निकालात दिसेल.
सोलापूरच्या तिहेरी लढतीबाबत उत्सुकता आहे, आपल्याला काय वाटते?
सोलापुरात भाजपच जिंकेल. तिथे आम्हाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील. इतर टप्प्यांमध्ये विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात माढासह राष्ट्रवादीचे बुरुज ढासळलेले दिसतील. धक्कादायक निकालांची नोंद आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई, ठाण्यातील सर्व दहाही जागा युती जिंकेल. शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने ते वाट्टेल बोलत सुटले आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
साध्वींचे वक्तव्य अयोग्यच
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी काढलेले
उद्गार अत्यंत अयोग्यच होते. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या व्यक्तीबाबत त्यांनी तसे बोलायला नको होते, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या वेळी मांडली. मात्र, प्रज्ञासिंह यांना भाजपने भोपाळमधून दिलेल्या उमेदवारीचे त्यांनी समर्थन केले. राहुल गांधी तर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत तरीही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रज्ञासिंह यांना एनआयएने क्लीनचिट दिलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.