MNS Candidate Vidhan Sabha Election 2024: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे विद्यमान आमदार प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील मनसेचे उमेदवार असणार आहेत, तर ठाणे विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही राज ठाकरेंनी जाहीर केली.
राजू पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "माझं आधीच घर छोट पडत होतं म्हणून मी नवीन घर घेतलं. पण, अशा भेटी जर मला यायला लागल्या, तर मला याहून मोठं घर घ्यावं लागेल. भेटी ठेवायच्या कुठे सगळ्या?", असे मिश्कील भाष्य राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची गर्दी बघून केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आपल्या उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय. आज किंवा उद्या आपली पहिली, खरंतर दुसरी यादी जाहीर होईल. आज, उद्या यादी जेव्हा जाहीर होईल, त्याच्याआधी आज मी इथे आलोच आहे, तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतोय", अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.
उमेदवारी अर्ज भरायला ठाण्यात येणार
"जाता जाता एकच गोष्ट सांगेन येत्या २४ तारखेला मी अविनाश जाधव आणि राजू दादा यांचा फॉर्म भरण्यासाठी येतोय. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने यावे", असे आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.
भाजपाकडून ठाण्यात संजय केळकर
ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपाने विद्ममान आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये संजय केळकर यांना ९२२९८ मते मिळाली होती. या निवडणुकीत अविनाश जाधव यांना ७२८७४ मते मिळाली होती. केरळकर १९ हजार ४२४ मतांनी पराभव केला होता.