चेन्नई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लाखो चाहते, कार्यकर्ते आहेत, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा अशी भूमिका मांडत राज ठाकरेंनी मनसेची सीमा राज्यापुरती मर्यादित आहे असंही जाहीर केले होते, मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे १३ आमदार विधिमंडळात निवडून गेले. त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली आहे.
मनसेला राजकीय जीवनात यश-अपयश येत असलं तरी राज ठाकरे या नावाभोवती आजही राजकारण फिरतं, सत्तेत नसतानाही राज ठाकरेंकडे लोकांची गर्दी असते, मनसेचा केवळ १ आमदार यंदाच्या निवडणुकीत निवडून आला आहे. पण राज ठाकरेंचे कार्यकर्ते कमी झाले नाहीत. राज ठाकरे हे महाराष्ट्रापुरते मर्यादित असले तरी त्यांचे चाहते बाहेरच्या राज्यातही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत, अशाच एका राज ठाकरेंच्या चाहत्याने चक्क तामिळनाडू नवनिर्माण सेना स्थापन करत स्थानिकांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.
तामिळनाडू नवनिर्माण सेनेचे शिवा बालन हे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक होते, रविवारी शिवा बालन यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. राज ठाकरेंना आपला आदर्श मानत शिवा बालन यांनी तामिळनाडूत नवनिर्माण सेनेची स्थापना केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर विविध प्रश्नांना घेऊन त्यांनी आंदोलन केली, अनेक उत्सव-कार्यक्रमाचं आयोजन केले. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचे जोरदार काम सुरु होते.