- अतुल कुलकर्णी मुंबई : एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने राज्यभर भाजपच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणामुळे राज्यात विरोधी पक्ष नेमका कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला मतं चांगली मिळाली होती, आमचे आमदार होते, त्या ठिकाणीच आम्ही सभा घेतल्या आहेत, असे मनसेकडून सांगितले जात असले, तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात राज यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचे स्पष्ट आहे.आत्तापर्यंत त्यांनी राज्यात ७ सभा घेतल्या असून, चार सभा उद्यापासून सुरू होणार आहेत. २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीफ करणाºया राज ठाकरे यांनी अचानक मोदी व अमित शहा यांच्याविरोधी भूमिका घेत, राज्यात विरोधी वातावरण तयार केले आहे. क्लिप दाखवून भाजपचा फोलपणा समोर आणत आहेत. एकही उमेदवार उभा न करता राज्यभर चर्चेत राहण्यात ते यशस्वी झाले असून, विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. राज यांच्या सभांमुळे अपेक्षा न केलेल्या जागाही आघाडीला मिळतील, अशी चर्चा आहे.विधानसभेत राज यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आत्ताच सुरू झाली आहे. राज यांच्या सभांमुळे भाजप शिवसेनेला राज्यात ४८ पैकी ३०चा आकडा गाठता येणे कठीण आहे, असे रिपोर्टस् आहेत. मुंबईतही दोन जागा युतीला गमवाव्या लागतील, असे चित्र आज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी २०१४ मध्ये ६ जागी विजयी झाली होती. त्यांनी आता २० पर्यंत जाणे म्हणजे तिप्पट यश मिळविणे आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी राज्यात नवीन राजकीय समीकरणे दिसतील, असे बोलले जात आहे.जागांचे नवे गणितगेल्या वेळी मुंबई, पुण्यात राष्ट्रवादीच्या औषधालाही जागा आल्या नव्हत्या. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ सोडले, तर पक्षाला यश मिळाले नव्हते. राज यांनाही हेच तीन जिल्हे हवे आहेत. त्यासोबत नांदेड, सोलापूरमधूनही काही जागा मिळाल्या, तर त्याही त्यांना हव्याच आहेत.
राज ठाकरेंचे लक्ष्य मुंबई, पुणे, नाशिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:21 AM