मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण तापलेले आहे. (Maharashtra Politics) कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. अशा परिस्थितीत मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी विधान भवनात आले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतले. (Raj Thackeray went to meet the Chief Minister Uddhav Thackeray, but walked back through the door of the Vidhan Bhavan )
सध्या राज्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असल्याने कोरोनाबाबतचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच कडक निमयांची अंमलबजावणी करून होत आहे. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना चाचणी केलेली नसल्यास विधान भवनात प्रवेश दिला जात नाही.
दरम्यान, आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधान भवनाजवळ गेले होते. मात्र त्यांनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. विधान भवानात जाण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचे कळाल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच विधान भवनाच्या आवारातून माघारी फिरले.
गेल्या काही दिवसांपासून मनसे राज्य सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. राज्यात कोरोनाचे नियम कडक केलेले असताना आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात रात्रीच्या वेळी पब सुरू असल्याचे मनसैनिकांनी नुकतेचे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून दाखवून दिले होते. तर काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवरही शंका उपस्थित केली होती.