'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च टाका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावावर!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:17 AM2019-04-21T06:17:07+5:302019-04-21T07:01:03+5:30
पीयूष गोयल म्हणाले, हा तर सरोगेटेड प्रचार
- संतोष ठाकूर / विकास झाडे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विविध भागांत मनसेच्या सभा होत असून याचा खर्च काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारखर्चात टाकायला हवा, असे मत रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. मनसे दोन्ही पक्षांसाठी सरोगेटेड प्रचार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘लोकमत’ च्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यात ४0 ते ४२ जागा भाजपला मिळतील, असाही दावा केला.
निवडणूक आयोग अशा प्रचारास मान्यता देत नाही. तथापि, भाजपला देशात पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील. हा आकडा चकित करणारा असेल. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे काम खूपच चांगले आहे. त्यामुळे राज्यात आमच्या युतीला ४२-४४ जागा मिळतील. देशभरात मतदार पुढे येऊन मोदी लाट दाखवून देत आहेत, असेही ते म्हणाले.
पीयूष गोयल म्हणाले की, राज ठाकरे पूर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत. राज ठाकरे यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले आहे. मात्र, ज्या प्रकारे त्यांनी आपली लोकप्रियता गमावली, त्यामुळे ते अशा प्रकारची पावले उचलत आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा कोणताही परिणाम भाजप-शिवसेनेवर होणार नाही. जी व्यक्ती एकही जागा लढवीत नाही त्यातून त्यांचा आपला पक्ष आणि स्वत:वर किती विश्वास आहे, हेच उघड होते. अर्थात, त्यांच्या सभेत विनोद-थट्टा अधिक होते. मुद्द्यांमध्ये काही दम असत नाही. पीयूष गोयल यांनी सांगितले की, विदर्भात आम्हाला कमी जागा येतील असे आमचे पत्रकार मित्र म्हणत होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर तेच म्हणू लागले की, आमचा विदर्भात मोठा विजय होईल. मराठवाडा व मुंबईमध्येही आम्हाला मोठा विजय मिळेल.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण, ट्रान्सहार्बर लाइन, कोस्टल रोडपासून ते अनेक कामे आमच्या सरकारने केली आहेत. मराठवाड्यात लातूरमध्ये विक्रमी वेळेत रेल्वे कोच फॅक्टरीचे काम सुरू केले आहे. अमेठीच्या रेल्वे कोच फॅक्टरीची तुलना करायची झाली तर लातूरमध्ये केवळ ६० दिवसांत मंजुरी देऊन भूमिपूजन केले. लवकरच काम सुरू होईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुंबई-नागपूर मेट्रोसह नव्या रेल्वेचे कोच लातूरमध्ये तयार व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे. मराठवाड्याच्या या भागातून चार मुख्यमंत्री आणि दोन गृहमंत्री झाले. पण काँग्रेसने तेथे काहीच काम केले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६० दिवसांत बैठकीपासून ते भूमिपूजनापर्यंत सारे करून दाखवल्याबद्दल त्यांची प्रशंसा करावीच लागेल. सप्टेंबरपर्यंत कारखान्याचे काम सुरू होईल. त्याचप्रकारे मराठवाड्यात सिंचन योजनांना अधिक गती दिली जाईल. त्यामुळे आगामी ३० ते ५० वर्षांत येथे पाण्याची टंचाई जाणवणार नाही.