आज राजस्थानमध्ये नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये १२ जिल्ह्यांतील ५० जागांवर भाजपाला जबरदस्त नुकसान झाले आहे. ५४ पैकी ५० जागांचे निकाल हाती आले असून यापैकी ३६ जागांवर काँग्रेस जिंकली आहे. तर भाजपाच्या पारड्यात १२ जागा आल्या आहेत. तर दोन जागा अपक्षांना गेल्या आहेत.
५० मध्ये ७ नगर परिषदा आणि ४३ नगरपालिका होत्या. नगर परिषदांच्या ७ पैकी काँग्रेसला ५ जागा तर भाजपाला एकच जागा मिळाली आहे. उरलेली १ जागा अपक्षाला मिळाली आहे. या ५० जागांवर २८ पुरुष उमेदवार आणि २२ महिला उमेदवार जिंकल्या आहेत. या निवडणुकीला राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची परिक्षा म्हणून पाहिले जाते. यामध्ये काँग्रेस एकतर्फी जिंकली आहे.
पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भाजपा दु:खी नाहीय. राजस्थान भाजपाचे राज्य प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या कुशासनाला जनता त्रस्त झाली आहे. आज जर राजस्थानमध्ये निवडणूक घेतली तर भाजपा तीन चतुर्थांश मतांनी सरकार बनवेल. ग्राम पंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत भाजपाच्या विजयाची दिल्लीपर्यंत चर्चा होत आहे.