उदयपूर : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने राजस्थानमध्ये रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच दुकाने संध्याकाळी ७ वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल रात्री राजस्थानच्या माजी मंत्री आणि राजसमंदच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनाने निधन झाले. जवळपास महिनाभर त्या कोरोनाशी लढा देत होत्या.
किरण यांच्यावर गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किरण माहेश्वरी यांना २८ ऑक्टोबरला कोरोना झाल्याचे समजले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उदयपूरच्या गीतांजली ह़ॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना एअरलिफ्ट करून गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर तेथ उपचार सुरु होते.
सोमवारी किरण यांचे पार्थिव उदयपूरला आणण्यात येणार आहे. कोरोना आणि प्रोटोकॉल नुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहेश्वरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माहेश्वरी या वसुंधरा राजेंच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या.
महाराष्ट्रातही राष्ट्रवादीच्या आमदाराचे निधनमंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे, ते 60 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, काही दिवसांतच कोरोनावर मात करुन ते घरी परतले. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे.