कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेस मंत्री भिडले; पारा इतका चढला की बघणारेच अवाक् झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:48 PM2021-06-03T13:48:38+5:302021-06-03T13:51:38+5:30
बोर्डाच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी गहलोत सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमले होते.
जयपूर – राजस्थानच्या गहलोत सरकारमध्ये भलेही सर्वकाही ठीक असल्याचं दाखवलं जात असलं तरी वारंवार प्रदेश काँग्रेसमधील सरकारमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यात खडाजंगी झाली.
या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना सुनावलं. वाद वाढत असताना इतर सहकारी मंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयावरून बैठकीचं आयोजन केले होते. सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जमले होते तर मुख्यमंत्री वर्चुअलच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या परीक्षांचा निर्णय झाल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा डोटासरा आणि धारीवाल यांच्यात वाद झाला.
कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
या दोघांमधील वाद शमल्यानंतर गोविंद सिंह डोटासरा यांनी शांती धारीवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे केली. ते म्हणाले की, पार्टी संघटनेच्या विषयावर काही चर्चा सुरु असेल तर अध्यक्षांना बोलायलाही दिलं जात नाही. अशा वर्तवणुकीवर कारवाई होणं गरजेचे आहे. डोटासरा है बैठकीतून जायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढून त्यांचे म्हणणं ऐकून घेतले.
बैठकीच्या बाहेर येऊनही भिडले
कॅबिनेटची बैठक संपल्यानंतरही धारीवाल आणि डोटासरा एकमेकांशी भिडले. या दोघांचा वाद इतका जोरात होता की सगळेच जण अवाक् झाले. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर मंत्री एकमेकांसोबत जोरात भांडत असल्याचं पाहून सुरक्षारक्षकही चक्रावले. आता हे सपूर्ण प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे पोहचवलं जाणार असल्याची माहिती आहे.