जयपूर – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मुसळधार पावसाचा फटका विधानसभा अधिवेशनाला बसताना दिसत आहे. या पावसामुळे गहलोत गटाचे आमदार हॉटेलमधून दोन बसमध्ये बसून रवाना झाले होते. मात्र पावसामुळे रस्त्यावरील पाण्याने नदीचं रुपं घेतल्याने दोन्ही बसेस अडकल्या आहेत. त्यामुळे विधानसभा कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
काँग्रेस आमदारांची एक बस हॉटेलमधून विधानभवनात पोहचली आहे. त्यानंतर भाजपा आमदारही विधानभवनात दाखल झाले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होत आहे. कामकाज सुरु होताच विधानसभा अध्यक्षांनी सभागृह १ वाजेपर्यंत स्थगित केले. जयपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक आमदार वेळेवर सभागृहात पोहचू शकले नाहीत. सभागृह सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत विधानसभेत सत्याचा विजय होणार असं म्हटलं आहे.
जयपूरनमध्ये शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जयपूरच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे. रस्त्यावरील अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. तर लोकांनाही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. पुढील २४ तासांत जयपूर, अलवर, भरतपूर, भीलवाडासह राज्यातील पूर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यासह राज्यातील अजमेर, अलवर, बांसवाडा, बांरा, भरतपुर, सीकेरसह अन्य भागात वीज पुरवठा खंडीत होण्याचीही शक्यता आहे.
राजस्थानमधील राजकीय संघर्ष
मुख्य विरोधी पक्ष भाजपाने सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या घोषणेदरम्यान विधानसभेचे हे अधिवेशन खूपच गदारोळ होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या फक्त एक दिवस आधी सत्ताधारी कॉंग्रेसचे आमदार आणि मित्रपक्षांची बैठक झाली, भाजपा आणि तेथील घटक पक्षांचीही बैठक झाली.
दरम्यान, कॉंग्रेसने आपले दोन आमदार विश्वेंद्रसिंग आणि भंवरलाल शर्मा यांचे निलंबन रद्द केले. परंतु गुरुवारचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन नेत्यांनी जवळपास एक महिन्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. गहलोत आणि पायलट यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा हे होते. यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री निवासस्थानी झाली, त्यात गहलोत, पायलट तसेच कॉंग्रेस व त्यांचे समर्थक आमदारही हजर होते.
भाजपा विधिमंडळ पक्षात पक्षाने कॉंग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया म्हणाले की, शुक्रवारी सुरू होणार्या विधानसभेच्या अधिवेशनात अविश्वास ठराव आणला जाईल. आम्ही आमच्याकडून अविश्वास ठराव आणत आहोत असं त्यांनी सांगितले.