जयपूर – राजस्थानच्या अशोक गहलोत(Ashok Gehlot) सरकारवर पुन्हा एकदा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट(Sachin Pilot) आणि त्यांचे समर्थक आमदारांनी पार्टी हायकमांडला अल्टीमेटम दिला आहे. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या करण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत अशी भूमिका राजस्थानात पायलट समर्थकांनी घेतली आहे. मागील २ दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू आहेत. या बैठकीत पार्टी नेतृत्वाकडे आपलं म्हणणं मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे. आमदारांसोबतच जिल्हाप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला आहे. दोन दिवसांनी राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीदिवशी होणाऱ्या कार्यक्रमात सचिन पायलट त्यांची राजकीय ताकद दाखवण्यासाठी प्लॅन आखत आहेत.
सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, सरकारने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरातला लागून असलेल्या सीमांवर चौकशी वाढवली आहे. केव्हाही बॉर्डर सील केल्या जाऊ शकतात. पायलट समर्थक आमदार पुन्हा एकदा दिल्ली अथवा शेजारील राज्यात जाऊन सरकारविरोधात बंडखोरी करू शकतात अशी माहिती सरकारला मिळाली आहे. आमदारांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधीही जाण्याची शक्यता आहे. यावेळी गहलोत यांच्या समर्थकांमधील काही आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत. संधी मिळताच हे आमदार पायलट याच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी सकाळपासून गहलोत आणि पायलट गट सक्रीय झाला आहे. गहलोत यांच्या गटातील शांती धारीवाल, लालचंद कटारिया, राज्यमंत्री सुभाष गर्ग, महेश जोशी, महेंद्र चौधरी यांनी आमदारांना फोन करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. काहींसोबत वैयक्तिक भेटीगाठीही झाल्या आहेत. सोबतच पायलट समर्थक आमदारांसोबतही चर्चा सुरू आहे. पायलट यांचे विश्वासू आमदार रमेश मीणा, मुरारी मीणा आणि वेदप्रकाश सोलंकी यांनी आपल्या गटातील आमदारांना एकजूट करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच अपक्ष आमदार आणि बसपातून काँग्रेसमध्ये सहभागी झालेले आमदार यांच्याशी संपर्क वाढवला आहे.
पंजाबवर लक्ष अन् आमच्याकडे दुर्लक्ष
पायलट यांच्या गटातील नेत्यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी अजय माकन यांच्याशी संवाद साधला आहे. जेव्हा पंजाबमध्ये पक्षांतर्गत कलह वाढला तेव्हा हायकमांड सक्रीयता दाखवत आहेत. तर राजस्थानच्या बाबतीत गप्प का? पंजाबमधील नेत्यांशी चर्चा करू शकतात परंतु राजस्थानातील वाद सोडवण्यासाठी बनवण्यात आलेल्या कमिटीची अद्यापही एकही बैठक झाली नाही अशी नाराजी सचिन पायलट समर्थकांमध्ये आहे.