मुंबई – राजस्थानमध्येकाँग्रेस सरकारवर संकट आलं असताना त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक झाली.
बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली.
शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते, उद्धव ठाकरे उत्तम राज्य सांभाळत आहेत पण सरकार तीन पक्षांचं मिळून असल्याने त्यांनी संवादावर जास्त भर दिला पाहिजे, अलीकडेच मुंबई पोलिसांच्या बदलीप्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील बेबनाव समोर आला होता. त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यात यापुढे कोणत्याही प्रशासकीय बदल्या करताना आधी चर्चा मग बदली अशी भूमिका महाविकास आघाडीने स्वीकारली होती. (Sharad Pawar Meet CM Uddhav Thackrey)
राजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
राजस्थानमध्ये सध्या काय सुरु आहे?
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर सरकार अस्थिर होण्याचं संकट आहे. (Rajasthan Political Crisis) उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भावली आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे तर सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांचे शक्तीप्रदर्शन करुन सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास दाखवला आहे. राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाचं पडद्यामागून कार्य सुरु आहे असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे.