जयपूर – राजस्थानमधील राजकीय संघर्षात काँग्रेसनेसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटरवरुन खरेपणाचा छळ होऊ शकतो पण पराभव होत नाही असं विधान केले होते, त्यानंतर आता सचिन पायलट यांची पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत.
यात सचिन पायलट यांनी सांगितले की, राजस्थानच्या विकासासाठी माझ्या कामात नेहमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अडथळे आणले. अधिकाऱ्यांना मी दिलेले आदेश मानू नका अशा बजावण्यात आलं होतं. त्यामुळे अशाप्रकारे माझी अडवणूक होत असेल तर उपमुख्यमंत्रिपदाचा काय फायदा आहे, जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करु शकत नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांनी समर्थकांना विकासाची संधीही दिली नाही असं सांगितले. (Rajasthan Political Crisis)
त्याचसोबत अशोक गहलोत यांच्याशी नाराजीची कारणं काय या प्रश्नावर उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले, मी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी नाराज नाही, इतकचं नाही तर मी काही विशेष ताकदही मागितली नव्हती. फक्त जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावीत हीच माझी अपेक्षा होती. तसेच बंडखोरीचा पवित्रा घेण्यापूर्वी त्यांनी पक्षात चर्चा का केली नाही? या प्रश्नावरही सचिन पायलट यांनी उत्तर दिलं. काँग्रेस पक्षात अंतर्गत चर्चा करण्यासाठी कोणतंही व्यासपीठ राहिलं नाही, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी काहीच केले नाही असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सचिन पायलट यांनी अद्याप आपले पत्ते उघडले नसले तरी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत. तोपर्यंत ते दिल्ली जवळील मानेसरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या १६ व इतर आमदारांशी रणनीती बनवण्यात गुंतले आहेत. माध्यमांसमोर जाण्यापूर्वी ते अमित शहा व नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात, असेही समजते. तोपर्यंत काँग्रेस व अपक्षांचे नेते फोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. (Rajasthan Political Crisis)
सोनिया गांधी यांनी लिहिली पटकथा
काँग्रेसचे नेते सचिन पायलट, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची पटकथा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन लिहिली गेली. विश्वेंद्र सिंह, रमेश मीणासह अन्य पायलट समर्थक भाजपसोबत मिळून गेहलोत सरकार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याची एक ऑडिओ आणि एक व्हिडिओ यांची माहिती सोनिया गांधी यांना देण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ऑडियोमध्ये सचिन पायलट यांचा आवाज होता आणि ते राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गेहलोत सरकारला हटविण्याबाबत बोलत होते.