'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:10 PM2021-08-01T13:10:21+5:302021-08-01T13:10:29+5:30
Nana Patole slams governor: 'आपल्या देशावर चीनकडून कधीही हल्ला होऊ शकतो. पण, त्याबाबत मोदी कधीच बोलत नाहीत. '
पुणे: राजभवन हे भाजपा कार्यालय आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. आज पटोले यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी राज्यपाल माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलले होते. नेहरुंमुळं देशाचं वाटोळं झालं असं ते म्हणाले. राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही. पण, आता राजभवन हे भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
चीनबाबत मोदी बोलत नाहीत
पटोले पुढे म्हणाले की, आपल्या देशावर चीनकडून कधीही हल्ला होऊ शकतो. पण, त्याबाबत मोदी कधीच बोलत नाहीत. माध्यमांनी आता काही लिहिलं तर केंद्र त्यांना नोटीस पाठवून कारवाई करतं. देशात हुकूमशाही सुरू आहे. इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये काहीही बदल राहिला नाही. त्यावेळी राजीव गांधींची मोठी बदनामी केली गेली, असंही पटोले म्हणाले.
काय म्हणाले होते राज्यपाल ?
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित 'अशक्य ते शक्य' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले होते की, "अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरललाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण, त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण, त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं", असं विधान कोश्यारींनी केलं.