मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यावर भाष्य केले आहे. राज्याने रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत बोलणं केले. मात्र केवळ ३-४ कंपन्यांनीच राज्याला रिपॉन्स दिला. काही कंपन्यांनी मे महिन्यात इंजेक्शन पुरवठा करू असं सांगितल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, रेमडेसिवीरचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात राज्यात जाणवतो ही वस्तूस्थिती आहे. पण २१ तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही. दुर्देवाने खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणं असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही त्याची मागणी होते. काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरु आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत रेमडेसिवीर कंपन्यांचे उत्पादन वाढत चाललं आहे. किमान एक स्टॉक बाहेर पडायला २०-२२ दिवस लागतील. निर्यातबंदीमुळे १२-१३ कंपन्यांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रात विकाव्या यासाठी एफडीएचा प्रयत्न आहे. ३-४ कंपन्यांनी रिपॉन्स दिला आणखी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. राज्यातील जनतेसाठी रेमडेसिवीर उपलब्ध होईल असा सरकारचा प्रयत्न आहे असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले. निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. पण मधल्या काळात घडामोडी त्यात झाल्या वेगळं राजकारण यात झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. पण महामारीचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा असं विधान मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.