नवी दिल्ली - ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह यांनी सरकारी सेवेमधून निवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते भाजपामध्ये दाखल होऊन पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) हे सध्या लखनौमध्ये ईडीच्या विभागीय कार्यालयात संयुक्त संचालक म्हणून काम पाहत आहेत. बी.टेक, पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. राजेश्वर सिंह २००९ मद्ये उत्तर प्रदेशमधून प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये दाखल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये ते राज्य पोलीस सेवेमध्ये काम करत होते. (Rajeshwar Singh, an officer in the ED, on the way to the BJP, applied for retirement, the possibility of contesting the Uttar Pradesh Assembly elections)
सूत्रांनी सांगितले की, राजेश्वर सिंह यांनी सरकारी सेवेमधून सेवानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये भाजपात प्रवेश करू शकतात. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून लढू शकतात. मात्र त्यांचा निवृत्ती अर्ज अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राजेश्वर सिंह यांची बहीण आभा सिंह यांनी ट्विट करत आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, देशाची सेवा करण्यासाठी लवकर सेवानिवृत्ती स्वीकारण्यासाठी माझा भाऊ राजेश्वर सिंह याला शुभेच्छा देशाला त्यांची गरज आहे. आभा सिंह ह्या सध्या मुंबईत राहतात.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांना २०१५ मध्ये स्थायी स्वरूपात ईडीच्या कॅडरमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांनी २जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ, २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामधील अनियमितता आणि पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याविरोधातील आरोपांच्या चौकशीचे नेतृत्व केले होते.
दरम्यान, राजेश्वर सिंह यांच्यावर काही आरोपही झालेले आहेत. त्यांच्यावरील अनियमिततेच्या आरोपाची ईडी, सीबीआय आणि सीव्हीसीकडून चौकशी झाली होती. तसेच त्यासंदर्भात न्यायालयाला एक रिपोर्टही पाठवण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये राजेश्वर सिंह यांच्याविरोधातील आरोपांमध्ये फारसे बळ नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या प्रकरणाचा तपासही बंद करण्यात आला होता. राजेश्वस सिंह यांचा विवाह पोलीस अधिकारी लक्ष्मी सिंह यांच्याशी झाला होता. त्या सध्या लखनौ रेंजमध्ये महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.