Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 04:33 PM2021-05-16T16:33:57+5:302021-05-16T16:35:52+5:30

विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांनासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता, असे खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत बाळासाहेब थोरात म्हणाले. 

Rajiv Satav: "Congress loses dedicated leader with deep faith in ideas and bright future!" - balasaheb thorat | Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!"

Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!"

Next
ठळक मुद्देतरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई :  काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व  शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. समाजिक, राजकीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांनासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता, असे खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत बाळासाहेब थोरात म्हणाले. 

(क्षणाचाही विलंब न करता पक्षासाठी आमदारकी सोडायची तयारी दाखवणारे राजीव सातव!)

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणा-या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

याशिवाय, आम्ही सर्व या कठिण प्रसंगी सातव कुटुंबीयांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच, राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सावत यांचे रविवारी पहाटे निधन झाले. 

सोमवारी मूळगावी पार्थिवावर अंत्यसंस्कार
राजीव सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच स्थानिक काँग्रेस नेते मोहन जोशी, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे हे यावेळी उपस्थित होते. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

Web Title: Rajiv Satav: "Congress loses dedicated leader with deep faith in ideas and bright future!" - balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.