नवी दिल्ली – काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. नुकतेच ते कोरोनातून बरे झाले होते. परंतु सायटोमेगँलो व्हायरस या आजाराच्या विळख्यात अडकले. शुक्रवारपासून राजीव सातव यांची तब्येत खालावत होती. अखेर रविवारी पहाटे राजीव सातव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली.
राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे की, माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वेदना होत आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीला आणि आदर्शांना बळकटी देणारं आदर्श नेतृत्व होते. त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांचे मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे असं राहुल गांधी म्हणाले.
भारतीय राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरपला
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती
मनाला न पटणारी घटना
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच सर्वांना कळाली. अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी अशी ही बातमी आहे. अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे. राजीव सातव धडाडीचे नेते होते अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तुत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे असं दु:खं मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
कोण होते राजीव सातव?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. अशा काळात राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता. राजीव सातव हे सध्या राज्यसभेचे खासदार होते त्याचसोबत त्यांच्यावर गुजरात काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. तसेच माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र आहेत.