मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईत दोन, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये एक अशा चार सभा होणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी या चार सभांतून राज ठाकरे कोणता नवीन ‘व्हिडीओ लाव रे’ म्हणतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.मंगळवारी मुंबईतील काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर पहिली सभा होणार आहे. तर, बुधवारी २४ एप्रिलला भांडुप येथील जंगल मंगल रोडवर खडीमशीन येथे दुसरी सभा होणार आहे. खांदेश्वर स्टेशनजवळील गणेश मैदानावर गुरुवार, २५ एप्रिल रोजी तिसरी सभा होणार आहे. तर, चौथी सभा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. या चारही सभांची वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची आहे.लोकसभा निवडणुका लढविणार नाही, मात्र पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचार करणार, अशी भूमिका घेत राज यांनी राज्यात विविध ठिकाणी सभांचा धडाका लावला. या सभांच्या माध्यमातून त्यांची भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. या डिजिटल सभांची जोरदार चर्चा समाजमाध्यमात रंगते आहे. राज यांच्या भूमिकेवर आता भाजपकडूनही तिखट प्रत्युत्तर दिले जात आहे.राज ठाकरे प्रत्येक सभेत निवडणूक लढवत नसल्याचे आवर्जून सांगतात. त्यावर एक पक्ष वा नेता म्हणून ‘ज्याची लाज वाटायला हवी, तिचा अभिमानाने उल्लेख’ करतायत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आज पहिलीच सभा होत असल्याने त्याला राज कसे उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शेवटच्या टप्प्यात राज यांच्या चार सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:40 AM