Lok Sabha Election 2019: ..तर माढासह १५ जागांवर लढणार- राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:24 AM2019-03-13T02:24:59+5:302019-03-13T02:25:38+5:30
'बुलडाणा-वर्धा जागा न दिल्यास आज उमेदवारांची यादी जाहीर करू'
पुणे : लोकसभेच्या बुलडाणा आणि वर्धा जागा स्वाभिमानी पक्षाला मिळाल्या पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम असून, आघाडीने निर्णय न दिल्यास माढा, बारामती मतदारसंघासह १५ जागांवरील उमेदवारांची घोषणा बुधवारपर्यंत (दि. १३) करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी बालेवाडी परिसरात झाली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माणिकराव कदम, राजाभाऊ ढवाण, घनश्याम चौधरी या वेळी उपस्थित होते. आघाडीतील जागांचा अजूनही तिढा सुटलेला नाही. आघाडीने हातकणंगले जागा स्वाभिमानीला सोडल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या जागेवर स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी गेली दहा वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत.
माढ्यात भाजपाकडेच उमेदवार नाही
माढा मतदारसंघात विरोधी वातावरण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याचे वाटत नाही. उलट भारतीय जनता पक्षालाच उमेदवार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख लोकसभा निवडणूक लढवायला तयार नाहीत. यापूर्वी त्यांनी लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत किरकोळ मते पडली होती.
या जागांवरील उमेदवार तयार आघाडीने हातकणंगले मतदारसंघासह वर्धा आणि बुलडाणा दिली पाहिजे. मागणी मान्य न झाल्यास या जागांसह कोल्हापूर, माढा, सांगली, बारामती, शिर्डी, नंदूरबार, औरंगाबाद, परभणी, जालना, शिरूर आणि नाशिक या जागांवर उमेदवार तयार आहेत.