राज्यसभा निवडणूक; रजनी पाटील, संजय उपाध्याय रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:46 AM2021-09-21T07:46:45+5:302021-09-21T07:49:16+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत.
मुंबई : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. २०१७ मध्ये ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने हिंदी भाषक चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.