गाझियाबाद : 26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसेवरून गाझियाबाद सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन संपविण्याची तयारी करत होते. मात्र, अचानक आमदार महोदय आंदोलनस्थळी पोहोचले आणि सारा खेळच बिघडवून टाकला. टिकैत यांनी त्या आमदारांवरही सरकारसोबत मिळून कट रचत असल्याचा आरोप केला आहे.
भारतीय किसान युनियनने आमदार नंद किशोर गुर्जर आणि साहिदाबादचे आमदार सुनिल वर्मावर शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्याचे आरोप केले आहेत. तसेच कौशांबी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रारही दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आमदारांना फोन करून या प्रकरणी उत्तर मागविले आहे. तर आमदारांनी आपली बाजू अध्यक्षांकडे मागितल्याचे म्हटले आहे.
नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोनीचे आमदार आहेत. सुत्रांनी सांगितले की, राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा योग्य दिशेने जात होता. टिकैत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. अचानक सारा खेळ बिघडला. भाजपा आमदार गुर्जर त्यांच्या 100 हून अधिक समर्थकांना घेऊन आंदोलनात घुसले. यामुळे टिकैत यांनी अधिकाऱ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडली आणि थेट मंचावर जाऊन उभे राहिले. टिकैत यांनी असेच आरोप सुनिल शर्मा यांच्यावर लावले आहेत.
‘टिकैत हवे की डकैत, तुम्हीच ठरवा’; भावनिक आवाहनानंतर सीमांवर पुन्हा गर्दी!
लोनीचे हे आमदार नेहमीच चर्चेत असतात. गुर्जर हे आपल्याच सरकारविरोधात विधानसभेत आंदोलनाला बसलेले आहेत. पोलिसांच्या त्रासावर त्यांना काही बोलायचे होते. परंतू त्यांना बोलायला दिले नाही तर ते विधानसभेतच धरणे आंदोलनाला बसले. नंतर त्यांना या साऱ्या प्रकारावर खुलासा करावा लागला होता. आताही टिकैत यांच्या आरोपांवर गुर्जर यांनी खुलासा केला आहे. टिकैत यांचे आरोप खोटे आहेत. ते तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. माझे लोकेशन तपासा. मी त्यांच्या आंदोलनाच्या 10 किमी परिघातही हजर नव्हतो, असा दावा गुर्जर यांनी केला आहे.
आंदोलन सुरूच राहील - नरेश टिकैतमुजफ्फरनगर येथे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवर सुरू असलेले आंदोलन समाप्त करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. परंतु रात्री या सीमेवर झालेल्या प्रकारामुळे त्यांनी घोषणा मागे घेतली. रात्री किसान भवन येथे आपतकालीन पंचायत बोलावण्यात आली आणि चौधरी नरेश टिकैत यांनी आता आंदोलन चालूच राहील असे सांगितले.