मुंबई – अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून देशभरात राजकारण सुरु झालं आहे. राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीचे अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे साडे १८ कोटी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाने याबाबत पत्रकार परिषद घेत राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. यावर शिवसेनेनंही भाष्य केले होते.(BJP Mla Nitesh Rane Target Shivsena over Ram Mandir Land Scam Issue)
अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता. त्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी(BJP Nitesh Rane) त्यांना टोला लगावला आहे.
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.
शिवसेनेनं काय म्हटलं?
राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
काही मिनिटांत झाला संशयास्पद व्यवहार
संबंधित जमीन १८ मार्च रोजी सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. हा व्यवहार सायंकाळी झाला होता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली.
बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदीचा दावा
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.