Rohit Pawar Ram Shinde : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांना घेरण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंनी रोहित पवारांना धक्का दिला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ठाकरेंच्या शिवसेनेचे जामखेडचे तालुकाध्यक्ष, जामखेड शहराध्यक्ष आणि इतर मविआच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मधुकर राळेभात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सूरज काळे आणि महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश
मधुकर राळेभात, संजय काशीद यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. एका मतदारसंघातील तालुकाध्यक्षांचा पक्षप्रवेश फडणवीस, बावनकुळेंच्या झाल्याची चर्चा सुरू झाली.
"लढणार किंवा मदत करणार"
मधुकर राळेभात हे नाराज होते. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी " आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, तिकिटाची मागणी करणार. तिकीट मिळाले नाही, तर रोहित पवार यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला सर्व मदत करणार", असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत रोहित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात अडकून पडले होते. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अडकून ठेवण्याची रणनीती भाजपाची असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राम शिंदे यांनी मतदारसंघावर लक्ष घातले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा पराभव केला होता. रोहित पवारांना १,३५,८२४ मते मिळाली होती. तर राम शिंदे याना ९२ हजार ४७७ मते मिळाली होती. १९९५ पासून २०१९ पर्यंत हा मतदारसंघ भाजपाकडे होता.