"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:49 PM2024-10-07T18:49:11+5:302024-10-07T18:50:46+5:30

Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar: इंदापुरप्रमाणेच फलटणमध्येही पक्षप्रवेश होणार आहे, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे रामराजे नाईक अजित पवारांची साथ सोडणार, या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर आता अजित पवारांनी भाष्य केले.

Ramraje Naik Nimbalkar likely to join Sharad Pawar's NCP, Ajit Pawar's first reaction | "रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन

"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन

Ajit Pawar Latest News: गेल्या काही महिन्यांपासून फलटणमधील महत्त्वाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे. रामराजे नाईक निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. आता ते अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात शरद पवारांनी इंदापुरात केलेल्या विधानाने चर्चेला बळ दिले. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाष्य केले. 

"रामराजेंनी मला फोन केला होता", अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार सातारा दौऱ्यावर होते. पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "रामराजेंनी मला काल फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, मी मुंबईला येतोय. ते आज मुंबईला गेले आहेत. मी आज रात्री जाऊ शकणार नाही. पण, उद्या सकाळी मुंबईला जाणार आहे. त्यावेळी मी त्यांच्याशी बोलणार", असे उत्तर अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षातराच्या चर्चांवर दिले. 

काही आमदार आणि नेते सोडून जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "मी ते सगळं सांगितलं आहे. मी त्यावेळी तुम्हाला (माध्यमांना) भाषणात सांगितलं आहे की, काही इकडे-तिकडे जातात. निवडणुका जवळ आल्यावर असले प्रकार चालतात. आमच्याकडे ४० आमदार असल्यामुळे... मला ज्या जागा घ्यायच्या आहेत, त्या कमी आहेत. त्यांच्याकडे (शरद पवार) त्या जास्त आहेत, त्यामुळे त्यांना घ्यायला मूभा आहे", असे अजित पवार यांनी सांगितले. 

शरद पवारांचं इंदापुरात सूचक विधान

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी फलटणमध्येही १४ तारखेला एक पक्षप्रवेश कार्यक्रम असल्याचे सांगितले. 

पवार म्हणाले, "आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला. त्यांनी हट्ट केला, इंदापुरला चाललाय; १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे? म्हणाले, इंदापुरला आहे, तोच आमच्याकडं. म्हटलं कुठे? ते म्हणाले फलटणला", असं सांगत शरद पवारांनी उपस्थितांना प्रश्न केला, "समजलं का? आता याच्यानंतर फलटण. फलटण झाल्यानंतर जवळपास सगळ्या महिन्याचे दिवस बुक झाले आहेत."

Web Title: Ramraje Naik Nimbalkar likely to join Sharad Pawar's NCP, Ajit Pawar's first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.