- अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र रणजितसिंह यांंनी त्याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.सोमवारी स्वत: शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत विजयसिंह मोहिते यांना लढण्यास सांगितले. त्यावर विजयसिंह मोहिते यांनी माझ्याऐवजी रणजितला उमेदवारी द्या, असा आग्रह पवारांकडे धरला. त्यावेळी तुमच्यासाठीच मी जागा सोडत आहे असे पवारांनी सांगितले; पण मोहितेंनी मुलासाठीचा आग्रह सोडला नाही. त्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माण खटावचे काँग्रेसचे नेते जयकुमार गोरे, करमाळ्याच्या रश्मी बागल, माढ्याचे राष्टÑवादीचे नेते बबनदादा शिंदे या सगळ्यांनी रणजित यांच्या उमेदवारीला विरोध केला.रणजित यांनी मतदारसंघाशी संबंध ठेवलेला नाही, महसूल मंत्री चंद्रकात पाटील स्वत: रणजित यांचा विषय हाताळत आहेत, अशा तक्रार पवारांकडे करण्यात आली. एकवेळ विजयसिंह मोहिते यांना तिकीट दिले तर त्यांच्यासाठी काम करु; पण रणजितसाठी नाही, अशी भूमिकाही काही नेत्यांनी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.भाजपा प्रवेशाची चर्चाच झाली नाही : रणजितरणजित मोहिते म्हणाले, काल बारामती हॉस्टेलवर मिटींग झाली; त्यात साखर कारखान्याचे विषय निघाले. त्याचवेळी आता आपल्याला मंत्र्यांना भेटण्याचे ठरले होते. पण आपण भेटलो की लगेच त्याच्या बातम्या होतील हेही बोललो होतो आणि आज झाले तसेच. शंकर सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो मी चालवायला घेतलाय. त्याच्या प्रश्नांसाठी मी मंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही आणि आपण स्वत:साठी आग्रह धरलेला नाही, असे रणजितसिंह यांनी सांगितले.
रणजितसिंह मोहिते यांची ‘साखरपेरणी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 2:11 AM