Vidhan Sabha Adhiveshan: 31 जुलैपर्यंत MPSC मधील सदस्यांची भरती, नोकर भरती नाही; घोषणेची फडणवीसांकडून 'पोलखोल'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:06 PM2021-07-05T14:06:07+5:302021-07-05T14:09:06+5:30
Vidhan Sabha Adhiveshan: देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. यानंतर अजित पवारांनी ही घोषणा केली होती.
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादग्रस्त ठरला आहे. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. याचबरोबर स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. यावर अजित पवार (Ajit pawar) यांनी ३१ जुलै पर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा (MPSC recruitment announcement) भरण्याची घोषणा केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप केला आहे. (Devendra Fadanvis told about what exact Ajit pawar told about MPSC recruitment till 31 july, 2021.)
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
मात्र, ओबीसी आरक्षणावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यावेळी फडणवीसांनी विधानसभेच्या बाहेर येत अजित पवारांनी केलेल्या घोषणेवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी जी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे ती म्हणजे परिक्षा दिलेल्या उमेदवारांची भरती नव्हे, तर संस्थेत रिक्त असलेली पदे भरण्याची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मुदत कशाला लागते, ती कधीही भरता येतात, असा आरोप करत ही फसवी घोषणा असल्याचे फडणवीस म्हणाले.
तसेच ओबीसींच्या इम्पेरिकल डेटावर देखील त्यांनी आक्षेप घेतले. हा पॉलिटिकल इम्पेरिकल डेटा राज्याने तयार करायचा असतो, केंद्राने नाही. मग केंद्राकडून मागण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची दिशाभूल कशासाठी असे देखील फडणवीस यांनी विचारले.