मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ब्रुक फार्मा कंपनीकडून मिळणारा साठा हा राज्य सरकारकडेच जाणार होता हे आम्ही आधीपासून बोलत होता. आज स्वत: अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केल्यानं ठाकरे सरकार तोंडघशी पडलं आहे. जे मंत्री किंवा महाविकास आघाडीचे नेते रेमडेसिवीरसंदर्भात भाजपाच्या बाबतीत साप साप करत भुई थोपटत होते त्यांचं थोबाड फुटलेलं आहे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित मंत्री होते. ब्रुक फार्मा कंपनीचे अधिकाऱ्यांनी FDA खात्याचे सचिव, अधिकारी यांना कल्पना दिली होती. रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारलाच मिळणार होता. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत कंपनीने रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारला देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिंगणे यांनी प्रामाणिकपणे परवानगीसाठी प्रयत्न केले असं त्यांनी सांगितले.
पण जेव्हा ही गोष्ट भाजपाच्या माध्यमातून होतेय हे समजताच त्यावेळी सरकारचा अहंकार जागा झाला. लोकांच्या जीवापेक्षा स्वत: अहंकारातच जास्त रस आहे. रेमडेसिवीर टेंडर काढून कोट्यवधीच्या कमिशनचं नुकसान होईल म्हणून कुभांड रचलं गेले. दुपारी मंत्री धमकी देतात आणि रात्री एका दहशतवाद्याला अटक करावी तसं कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं. जो राज्याला मदत करण्यासाठी आला त्यांना उचलल्यानंतर आम्ही त्याठिकाणी गेलो होतो. आता राजेंद्र शिंगणे यांनी जे सांगितलं त्यामुळे या सर्वांचा डाव उघड झाला असा टोला प्रविण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.
राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “प्रविण दरेकर औषध कंपन्यांच्या माणसांसोबत मला भेटले, तेव्हा...”
काय म्हणाले होते राजेंद्र शिंगणे?
मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले. निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. ही वस्तूस्थिती आहे. पण मधल्या काळात घडामोडी त्यात झाल्या वेगळं राजकारण यात झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. पण महामारीचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा असं विधान मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे