मुंबई - आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासून कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर आणायचा असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला आहे. यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक झाली, या बैठकीत मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचा असेल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रहार केला.
शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात कुरघोडी सुरु आहे. तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवणं सोडा पण हात लावणंही शक्य नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे. त्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शेलारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, १०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला..कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला...ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत सत्तेत बसलात, तेव्हाच "भगव्याचा" रंग तुम्हीच फिका केलात, भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात असं त्यांनी सांगितले.
तसेच भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील, गुढीला "शुध्द भगव्याची" झालर चढवतील..!, तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा, मुंबईकरांना चँलेज देताय पण मुंबईकरच आता “करुन दाखवतील” असा चिमटा आशिष शेलारांनी शिवसेनेला काढला आहे.
सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा
मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा कुणाला आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भाजपाने असे ठरवले आहे की, यावेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा आता हा शुद्ध भगवा म्हणजे काय प्रकार आहे. बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या. त्या जिंकताना काय घाम फुटला हे देशाने पाहिले आहे. भाजपा शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपामध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न असा निशाणा शिवसेनेने भाजपावर साधला आहे.