मुंबई – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील उर्फ आबा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही जयंतीच्या निमित्ताने आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांच्या आठवणीबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्याशी सोशल मीडियावरुन संवाद साधला. त्यावेळी आर.आर आबांच्या जुन्या आठवणींनी सगळेच भावूक झाले.
सुप्रिया सुळेंनी रोहितला विचारलं की लहानपणी आबांनी कधी तुला विचारलं होतं का मोठेपणी काय बनायचं आहे? त्यावर रोहित पाटील म्हणाले. आबांनी मला विचारलं होतं, तू पुढे जाऊन काय होणार? तेव्हा मी लहान होतो, तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची म्हणून मी ड्रायव्हर व्हायचं आहे सांगितले. त्यानंतर मी मोठा झालो, पोलिसांना पाहू लागलो तेव्हा मी परत सांगितले मला पोलीस बनायचं आहे, तेव्हा आबा म्हणाले, त्यासाठी तुला उंची वाढवावी लागेल, तू माझ्या एवढा राहिला तर तुला पोलीस बनता येणार नाही. पण आता यशस्वी वकील बनायचं आहे असं सांगितले.
तर आबांनी मुलांना जिल्हा परिषदेत टाकायचं हा निर्णय घेतला तेव्हा सुमनताई तुमची काय भावना होती यावर सुमन पाटील म्हणाल्या, आबांच्या प्रत्येक निर्णयात मी साथ दिली, मुलं हुशार असली तरी कुठेही शिकली तरी पुढे जातात असं आबा म्हणायचे. यावेळी रोहित पाटलांनी सांगितलं की, स्मितादिदी आम्हाला इंग्लिश माध्यमात टाकलं का नाही? तेव्हा आबांनी प्रश्न केला की, तुमचं काय नुकसान झालं? मुलं हुशार असली की त्यांना कोणत्याही माध्यमातून शिकली तरी काही फरक पडत नाही असं आबा म्हणाल्याचं रोहित पाटील यांनी सांगितले.
रोहित पाटलांकडून आबांच्या आठवणींना उजाळा
आबा घरी कधीच चिडले नाहीत, रागावले नाहीत. मुलांबरोबर गप्पा मारायचं, गावी आल्यानंतर शेतात फिरायला घेऊन जायचं. शेतात गेल्यावर लहानपणीचं किस्से सांगायचे. आम्ही लहान असताना काय केले, विहिरीच्या काठावर गेले तिथून उड्या मारायचो तुम्ही उडी माराल का? मुलांची पोहण्याची स्पर्धा पाहायला आबा यायचे, मला डॉग हवा होता, त्यासाठी मी प्रचंड रडलो होतो, त्यांनी तो हट्ट पूर्ण केला. त्यानंतर आई-आजी ओरडल्यानंतर त्यांनी परत पाठवलं होतं, त्यानंतर क्लासमध्ये पहिला ये, तुला डॉग घेऊन ये असं बोलले होते. सहावीत पहिला आल्यानंतर पुन्हा बोलले सातवी, आठवी, नववीत, दहावीत पहिला ये असं बोलले, आबांना स्वत: प्राण्यांची आवड होती, पण आजीला आवडत नसल्याने त्यांनी ते सोडून टाकली असं रोहित पाटील म्हणाले.
आबांनी पुन्हा मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही
मुंबईला असताना आबांचा फोन यायचा तेव्हा कसा आहेस, काय करतोय आणि मार्क्स किती असा प्रश्न नेहमी असायचा. आबा स्वत:हून कधी रागावले नाहीत, ते एकदा गावी आले होते, तेव्हा मी शाळेतून घरी आलो होतो. त्यांनी आमच्या भावंडांचा अभ्यास घ्यायचं ठरवलं, मी गणितात कमकुवत होतो. तेव्हा आबांनी मला १० गणिताची उदाहरणं सोडवून घेतली. माझा सगळा होमवर्क त्यांनी सोडवून दिला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर मास्तरांनी माझी नोटबुक फाडली होती, शिकवलेली सगळी गणितं चुकली होती. त्यानंतर आबांनी कधी अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही असा किस्सा रोहित पाटील यांनी सांगितला.
आबांचा मुलगा म्हणून जबाबदारी खूप आहे
सुरुवातील आबांचा मुलगा म्हणून खूप दडपण यायचं. मी आता फिरताना अनेकदा माझी आणि आबांची तुलना येते. आबांनी राजकारणाच्या २५-३० वर्षानंतर ते यश मिळवलं होतं. आता आईसोबत फिरताना अनेकदा त्या भावनेने लोक बघतात. याबद्दल माझे चुलते, आई सगळ्यांशी बोलतो पण त्यांनी सांगितले तु कधी दडपण घेऊ नको. मुलगा म्हणून खूप जबाबदारी आहे. आता मला ते जाणवू लागलं आहे, आपल्या वडिलांवर लोकांचा इतका विश्वास आहे त्यामुळे आपणही लोकांसाठी उभं राहायला पाहिजे असं रोहित पाटील यांनी सांगितले.