"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:03 AM2020-08-12T11:03:34+5:302020-08-12T11:07:32+5:30
राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.
चंदिगड - गेला महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर नुकताच मिटला आहे. मात्र राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे.
पंजाबमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी कॅप्ट्न अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी पक्षनेतृ्वाकडे केली आहे. राज्यातील काँग्रेसचे ९० टक्क्यांहून अधिक आमदार हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना पदावरून तत्काळ हटवावे, अन्यथा पंजाबमध्ये काँग्रेसचा गेम ओव्हर होईल, असा इशारा प्रताप सिंह बाजवा यांनी दिला आहे.
बाजवा म्हणाले की, राज्यातील आमदार पक्षाच्या बाजूने पत्रके प्रसिद्ध करत आहेत. मात्र खरेतर ते सरकार आमि पक्षसंघटनेवर नाराज आहेत. कॅप्टन आणि जाखड यांचे नेतृत्व पंजाबमध्ये कायम राहावे, असे या आमदारांना वाटत नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाने याबाबत पक्षनेतृत्वाने लवकरच निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमदारांना गटागटाने न बोलावता एकेकाला दिल्लीत बोलावून त्यांची व्यथा ऐकली पाहिजे.
मात्र यादरम्यान, मुख्यमंत्री, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांना बोलावू नये. आमदारांशी चर्चा करून जेव्हा पक्षश्रेष्ठी कॅप्टन आणि जाखड यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस आमदारांची मोजणी करतील तेव्हा नाराज आमदारांची संख्या ही ९० टक्क्यांऐवजी ९५ टक्के एवढी भरेल. असा दावाही बाजवा यांनी केला. तसेच पक्षनेतृत्वाने सर्वांची बाजू ऐकून घेऊन लवकरच स्थिती स्पष्ट करावी. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कुण्या एका व्यक्तीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले पाहिजे. मात्र कॅप्टन यांच्याकडे नेतृत्व सोपवले गेल्यास २०२२ पर्यंत राज्यात काँग्रेसचा गेमओव्हर होईल. तसेच मी काही कॅप्टनच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार नाही.
काही दिवसांपूर्वी झालेल्या विषारी दारूकांडानंतर बाजवा आणि राज्यसभा खासदार समशेर सिंग दुलो यांनी सीबीआय तपासासाठी राज्यपालांकडे पत्रक दिले होते. तेव्हापासूनच पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत लढाई शिगेला पोहोचली आहे.