परभणी - परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिकांना(Nawab Malik) हटवण्यात यावं अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केली आहे. याबाबत बोधने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. परभणी जिल्ह्याला पूर्णवेळ कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी शिवलिंग बोधने यांनी पत्रात केली आहे.
शिवलिंग बोधने म्हणाले की, नवाब मलिक हे राज्य सरकारमधील मोठे मंत्री आहेत. त्याचसोबत मलिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचीही मोठी जबाबदारी आहे. गेल्यावर्षीही कोविड काळात नवाब मलिक यांना परभणीकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. कधी जिल्ह्यात आले तर फक्त २ तासात आढावा घेऊन परत जातात. परभणीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. पालकमंत्री नवाब मलिकांना वेळ देण्यास लक्ष नाही. परभणीतील जनतेच्या हितासाठी आम्ही ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अडचणीच्या काळात प्रत्येक जण गावोगावी जाऊन मदत करतोय, परभणीत पालकमंत्र्यानी यावं इथं थांबावं प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात अशी अपेक्षा आहे. पालक म्हणजे पालकाप्रमाणे जिल्ह्याची काळजी घ्यावी. आम्ही राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजकारणासाठी आम्ही ही मागणी करत आहोत. परभणी जिल्ह्याचे ऑक्सिजन सिलेंडर इतर जिल्हे पळवत आहेत पण पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा दावाही शिवलिंग बोधने यांनी पत्रातून केला आहे.
गुरुवारीच नवाब मलिकांनी केली होती कोविड रुग्णालयाची पाहणी
जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे असं पालकमंत्री नवाब मलिकांनी सांगितले होते. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल अशीही माहिती नवाब मलिकांनी दिली होती.
कोरोनामुक्तीचा आकडा वाढला
चार दिवसांपासून परभणी जिल्हावासीयांना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे. दररोज ५०० ते ६०० रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. रविवारी तब्बल १ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. कोरोनामुक्तीचा आकडा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.