भाजपला मदत करणारे अधिकारी तातडीने दूर करा; काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीतील सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 06:38 AM2021-03-24T06:38:35+5:302021-03-24T06:38:59+5:30
तिघांनीही एकत्र येऊन लढा, बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले.
अतुल कुलकर्णी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे आहे. तिघांनी एकत्र येऊन संकटांना सामोरे गेले पाहिजे. एकटे लढल्यामुळे जो परिणाम असायला हवा तो साधला जाणार नाही. तसेच भाजपशी जवळीक असणारे अधिकारी शोधून तातडीने दूर करावेत, असा सूर काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत उमटला.
बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले. आम्ही आढावा बैठक घेतली आहे एवढा संदेश आमच्या मित्रपक्षांना पुरेसा आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना स्पष्ट केले. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. सरकारवर ज्या पद्धतीने भाजप हल्ला चढवत आहे, तो पाहता या राजकीय हल्ल्यांना एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. मात्र तसे न होता ज्या पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत, त्या पक्षाचे मंत्री उत्तर देताना दिसत आहेत. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्या प्रकरणात हेच दिसून आले. आता अनिल देशमुख प्रकरणाची बाजूदेखील राष्ट्रवादीचे नेते मांडताना दिसत आहेत. हे होऊ द्यायचे नसेल आणि एकत्रितपणे सगळ्यांचे सरकार आहे असे दाखवायचे असेल तर विश्वासात घेऊन रणनीती ठरवावी लागेल, असेही बैठकीत चर्चेला आले.
अधिकारी भाजपला माहिती देतात
सरकार बदलले तरी भाजपशी जवळीक असणारे अनेक अधिकारी आजही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलण्याची गरज आहे. तसे बदल केले नाही तर हे अधिकारी सरकारमधील माहिती भाजपाला देतील. सातत्याने हेच होत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे अधिकारी शोधून तातडीने त्यांना दूर करणे हा महत्त्वाचा विषय मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावा लागेल. अशीही चर्चा बैठकीत झाली. सर्व मंत्र्यांची मते आम्ही जाणून घेतली. आमचा अहवाल आणि केंद्र सरकारला पाठवू, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
समन्वय समितीवर भर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री जाऊन भेटतात. माहिती देतात, त्यात गैर काही नाही. मात्र तीनही पक्षांमध्ये वाद-विवाद झाल्यास किंवा सरकारवर काही गंडांतर आल्यास समन्वय समितीची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा, असे सरकार स्थापन करताना ठरले होते. समन्वय समितीची बैठक तातडीने घेतली गेली पाहिजे. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याची वस्तुस्थिती सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सांगितली पाहिजे, असेही काही मंत्र्यांनी सांगितले.