- राजू नायकभाजपने मगोपला खिंडार पाडून दोन आमदारांना आपल्यात सामावून घेतले. भावाला मंत्रीपद मिळवून देण्याचा नादात सुदिन ढवळीकरांनी पायावर कुºहाड मारून घेतली. त्यामुळे मगोपने लोकसभेसाठी काँग्रेसला तर विधानसभा पोटनिवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना समर्थनदिले आहे.भारतात नेत्यांची अतिमहत्त्वाकांक्षा व वैयक्तिक करिष्म्याला खतपाणी घालताना पक्षाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे गोव्यातील एकेकाळच्या प्रबळ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासमोर आज अस्तित्वाचे संकट उभे आहे. पक्षाचे संस्थापक भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासमोरही ते झाले होते. परंतु आजचे पक्षप्रमुख ढवळीकर बंधू आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्यातील फरक असा की, भाऊसाहेबांनी बहुजन समाजाचे सामाजिक पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी गोव्यात पहिली राजकीय क्र ांती घडविली. तेव्हा बहुजन समाजाच्या नावाने राजकारण करता येते आणि चळवळीतून त्यांचे सामाजिक उत्थान घडवता येते याचा साक्षात्कार झाला नव्हता. भाऊसाहेबांनी या विचारांचे बिजारोपण केले होते. भाऊसाहेबांचा बहुजन समाजाविषयीचा कळवळा एवढा उत्कट होता की, १९६३ साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने नेहरूंच्या काँग्रेसचा धुव्वा उडवला. काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकून आला नाहीच, अनेकांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यानंतर काँग्रेसने मगोपला नामोहरम करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. आता हा पक्ष गलितगात्र झाला असून, त्याचे नेतृत्वही उच्चवर्णीयाकडे गेले आहे.भाऊसाहेबांनंतर पक्ष सांभाळणे व त्याचे संवर्धन करणे त्यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकरांना शक्य झाले नाही. १९७३ साली त्या मुख्यमंत्री झाल्या, परंतु पक्षातील तेव्हाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांना महिलेचे नेतृत्व स्वीकारणे शक्य नव्हते. तरीही दोनदा ताई मुख्यमंत्रीपदी निवडल्या गेल्या. एव्हाना ख्रिश्चनांचे प्रभुत्व असलेला युनायटेड गोवन्स हा स्थानिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. त्यानंतर तार्इंविरोधात प्रस्थापित विरोधी लाट उसळली. तिचा फायदा घेऊन काँग्रेसने मगो पक्षाला खिंडार पाडले. तार्इंचे सरकार १९८९ साली पडताच बाहेर पडलेले पहिले मोठे नेते होते प्रतापसिंग राणे. लाटेत ताई पराभूत झाल्याच, पण मगोपचे पाचच आमदार निवडून आले. बहुजन समाजाचे नेते म्हणून काँग्रेसने राणे यांना मुख्यमंत्रीपद दिले. तार्इंना पक्षांतर्गत कारवायांना सामोरे जावे लागले. त्यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष काढला. त्या पुन्हा मगोपमध्ये परतल्या. तोपर्यंत मगोपवर रमाकांत खलप यांचे प्रभुत्व निर्माण झाले होते.खलपांनी विरोधी पक्षनेतेम्हणून छाप पाडून १९८०च्या निवडणुकीत १९ आमदार निवडून आणले. काँग्रेसच्या फुटीर गटाने विभक्त होत खलपांशी संधान बांधून पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करून सरकार घडवले. खलप उपमुख्यमंत्री होते. पण प्रयोग फार चालला नाही, सत्तेसाठी नेत्यांनी भ्रष्टांपुढे लोटांगण घातल्याने त्यांना अव्हेरले. मगोपला १९८४ साली केवळ ८ सदस्यांवर समाधान मानावे लागले. पक्षाला उतरती कळा लागली. त्यानंतर पक्ष भाजपच्या वळचणीला गेला.भाऊसाहेब हिंदुत्ववादी नव्हते. गोवा मुक्तीलढ्यात त्यांची प्रतिमा हिंदंूचा कैवारी अशी होती, परंतु त्यानी हिंदुत्ववाद जोपासला नाही. पण मगोपने भाजपशी जवळीक केल्याने भाजपचे चार जण विधानसभेत गेले. देशभरात हिंदुत्ववादाची द्वाही फिरत असताना आपले कार्यकर्ते व मतदारांना बांधून संघटना सुदृढ बनवणं मगोपला शक्य झाले नाही. परिणामी भाजपने संघटना बांधून काढली. अनेक तरुण कार्यकर्ते त्या पक्षात गेले. मगोपचे कार्यकर्ते विखुरले गेले होते. नव्या पिढ्यांना कार्यक्रम देणे व नवे नेतृत्व उभारणे मगोपला जमले नाही. भाजपच्या वाढत्या रेट्यापुढे मगोपचे किल्ले ढासळू लागले. खलप व अन्य सहकारीही भाजपमध्ये गेले. स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याचा त्यांचा यत्न होता. मात्र भाजपने हे नेतृत्व संपवले. त्यामुळे खलप व त्यांच्या सहकाऱ्यांपुढे काँग्रेसची दारे ठोठावण्याचा पर्याय होता.दुसरीकडे मगोपचे नेतृत्व सुदिन ढवळीकर या उच्चवर्णीयाने काबीज केले आहे. आज मगोप एका घराण्याचा पक्ष आहे. सुदिन यांचे बंधू दीपक ढवळीकर पक्षाध्यक्ष आहेत. एक-दोन जागांवर जिंकून सतत सत्तेच्या उबेत राहायचे, हेच मगोपचे उद्दिष्ट राहिले आहे. या उचापतींमुळे सुदिन ढवळीकरांना उपमुख्यमंत्रीपदही गमवावे लागले. भाजपने त्या पक्षाला खिंडार पाडून दोन सदस्यांना आपल्यात सामावून घेतले. केवळ भावाला मंत्रीपद मिळवून देण्याचा नादात सुदिन ढवळीकरांनी आपल्याच पायावर कुºहाड मारून घेतली. त्यामुळे मगोपने लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला असून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना समर्थन देण्याची कसरत केलेली आहे.उद्याच्या अंकात :पंजाबातील अकाली साम्राज्य
बहुजनांच्या पुनरुत्थानासाठीच्या मगोपचे अस्तित्व पुन्हा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:04 AM